Tuesday, April 21, 2026

उन्हाळा कसा सुसह्य कराल?

उन्हाळा सुरु झाला की प्रामुख्याने दोन तक्रारी जाणवू लागतात.

एक म्हणजे सारखी तहान लागणे 

दुसरी म्हणजे भूक कमी होणे 

हवेतील उष्मा वाढला की शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्वचेवरील रंध्र उघडली जातात. घामावाटे अतिरिक्त उष्णता शरीराबाहेर टाकली जाते. त्यामुळे शरीरातील पाणी सतत कमी होत राहते आणि तहान लागल्याची भावना वारंवार होते. पण या घामा वाटे शरीरातील आवश्यक क्षार देखील बाहेर जातात त्यामुळे थकवा थकवा जाणवतो व सारखे काहीतरी द्रव पदार्थ प्यावेत अशी भावना होते.

केवळ पाणी पिऊन ही तहान भागत नाही त्यासाठी क्षार मिळतील अशा पद्धतीचे द्रव पदार्थ पिणे गरजेचे असते याच अपेक्षेने आपल्याकडे उन्हाळ्याच्या दिवसात  सरबत, पन्हं नारळ पाणी,ताक इत्यादी पिण्याची पद्धत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात नैसर्गिकपणे जास्त पाणी असणारी फळे निर्माण होतात. द्राक्ष, आंबे कलिंगड,खरबूज यासारखी फळे आवश्यक त्या पाण्याची पूर्ती करतात त्याच वेळी शरीराला त्वरित तरतरीही देतात. या सर्व फळांचे रस न काढता फळांच्या फोडी करून खाण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे तंतुमय पदार्थ देखील मिळतात.

ताक पिताना ते बाधू नये म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी घालून ते पातळ करावे व त्यात सैंधव मीठ, किंचित साखर व कोथिंबीर घालून ते दुपारच्या जेवणात प्यावे.उन्हातून घरी आल्यावर एकदम थंड पाणी न पिता गुळाचा खडा खाऊन वर पाणी प्यावे कोकम सरबत, लिंबू सरबत, कच्च्या व उकडलेल्या कैरीचे पन्हे पिऊ शकतो. 

नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक रित्या सर्व क्षार उपलब्ध असतात शिवाय ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी नारळ पाणी हा उत्तम पर्याय ठरतो फ्रीजमधील कृत्रिम रित्या थंड केलेल्या पाण्यापेक्षा माठातील नैसर्गिकपणे गार झालेले पाणी तहान अधिक चांगल्या प्रकारे भागवते. माठामध्ये मोगऱ्याची फुले वाळा असे पदार्थ टाकल्यास हे सुगंधी पाणी अधिकच कार्यकारी ठरते.

जेवणामध्ये कच्चा कांदा, कैरी, काकडी, टोमॅटो अशा प्रकारच्या शरीरात थंडावा निर्माण करणाऱ्या व जास्त पाणी असणाऱ्या भाज्या नियमित वापराव्यात.

गोड पदार्थ खायचे झाल्यास खिरींचा वापर करता येईल. तळकट पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात टाळावेत. भूक कमी लागत असल्यास दिवसातून चार-पाच वेळा थोडे थोडे खावे.

Wednesday, April 24, 2019

उन्हाळा सुसह्य होण्यासाठी

1. भरपूर द्रव आहार घ्यावा म्हणजे खीर, पन्हं,सरबत, ताक,नारळपाणी इ.
2. पाणी भरपूर असणारी फळं किंवा भाज्या आहारात अवश्य समाविष्ट करा उदा. कलिंगड, खरबूज, द्राक्षं, काकडी, टोमॅटो, कांदा इ.
3. दर दीड दोन तासांनी थोडं थोडं पाणी प्या.
4. पाण्याचा थंडावा वाढावा म्हणून त्यात वाळा, मोगऱ्याची फुलं टाका.
5. हात पाय, डोळे यांची आग होत असेल तर थोडे धणे, जिरे भरडून ते थोडा वेळ पाण्यात भिजवून मग ते पाणी गाळून त्यात खडीसाखर टाकून प्या.
6. नाकातून उष्ण वाफा येणं, रक्त येणं अशा तक्रारी असतील तर सकाळी एक चमचा गुलकंद खा.
7. तूप गुणाने थंड आहे, तसंच दूध, लोणी हे पदार्थ ही, तेव्हा त्यांचा आहारात वापर करा.
8. दही स्पर्शाला थंड वाटलं तरी गुणाने उष्ण आहे, त्यामुळे उन्हाळ्यात दही नको, भरपूर पाणी घालून, मीठ, जिरेपूड घातलेलं ताक चालेल.
9. पेप्सी, कोक वगैरे आर्टिफिशियल कोल्ड्रिंक्स पेक्षा लिंबू सरबत, कोकम सरबत ,कैरी पन्हं नक्कीच अधिक पथ्यकर आहेत.
10. फ्रीजपेक्षा माठातील गार पाणी अधिक थंडावा आणि समाधान देतं, तहान भागवतं.
11. अगदी कोमट किंवा गार पाण्याने अंघोळ करायला हरकत नाही.
12. गार पाण्यात पोहणं हा उत्तम व्यायाम आणि त्याच वेळी गरमी, घाम घालवण्यासाठी छान, सुखद उपाय खालील प्रकारे -


1. घाम शोषून घेतील असे मऊ,सुती आणि फिक्या रंगाचे कपडे वापरावे.
2. फिटिंगचे,टाईट बसतील असे कपडे टाळावे,विशेषतः जाडजूड
3. जीन्स घालणं नक्कीच टाळावं कारण त्यामुळे मांड्यांजवळ खूप घाम येतो, पुरळ,घामोळी येऊ शकतात.
4. ज्यांना खूप घाम येतो त्यांनी दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी साबण वापरण्यापेक्षा डाळीचे पीठ, हळद, चंदन पावडर टाकून वापरावी उन्हाळ्यात होणाऱ्या इतर त्रासांसाठी आणि त्यावरील वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधा.



- वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)

आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर
स्वामी समर्थ केंद्राशेजारी ,रथचक्र सोसायटी मागे
इंदिरानगर ,नाशिक

0253 2322100